नवी दिल्ली-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना राष्ट्रवादी असल्याचे निरीक्षण अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेने नोंदवले आहे. तर त्यांच्या फॅक्टबुकमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन संघटनांचा उल्लेख ‘धार्मिक दहशतवादी समूह’ असा केला आहे. राजकीय दबाव टाकणाऱ्या संघटनांच्या यादीत सीआयने बजरंग दल आणि विहिंपचे नाव समाविष्ट केले आहे. बजरंग दलाने अमेरिकेच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे.
बजरंग दलने केली टीका
सीआयएने काश्मीरच्या हुर्रियत कॉन्फरन्सला कट्टरतावादी संघटना असल्याचे नमूद केले आहे. तर जमीयत उलेमा-ए-हिंद ही धार्मिक संघटना असल्याचे सीआयएने फॅक्ट बुकमध्ये म्हटले आहे सीआयएने घेतलेल्या या निर्णयावर बजरंग दलाने टीका केली आहे. आमच्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय खुला आहे. सीआयएच्या फॅक्टबुकविरोधात कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही कायदेशीर सल्लामसलत करतो आहोत असे बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक मनोज वर्मा यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची गुप्तचर संघटना आमच्या संघटनेला दहशतवादी संघटना कसे काय म्हणू शकते? त्यांना हा अधिकार कोणी दिला? आमच्या संघटनेच्या शाखा भारताबाहेरही आहेत. एवढेच नाही आम्ही कधीही कोणाचेही नुकसान केलेले नाही. आम्ही राष्ट्रवादी आहोत. आमच्याबद्दलचे फॅक्टबुकमधले मांडण्यात आलेले मत कसे बदलता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असेही बजरंग दलातर्फे सांगण्यात आले आहे.
२६७ देशांची माहिती
‘द वर्ल्ड फॅक्टबुक’ हे अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचे वार्षिक प्रकाशन आहे. यामध्ये २६७ देशांची माहिती उपलब्ध असते. या फॅक्ट बुकमध्ये देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, उर्जा, दळणवळण सेवा, लष्कर याबाबतची माहिती दिलेली असते.