धावता-धावता साधणे निरामय आरोग्यसिध्दीचे फळ!

0

जळगाव । डिसेंबर 2015 मध्ये किरण बच्छाव यांचा 21 किमी गोवा मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम एका बातमीत वाचल्यानंतर आपणही मॅरेथॉन स्पर्धेत धावू शकतो अशी संकल्पना मनात ठेऊन शहरात डॉ. रवि हिरानी यांच्या संकल्पनेतून ‘जळगाव रनर्स गृप’ निर्मिती झाल्यानंतर त्यांच्यासारख्या समविचारी सहा सहकार्‍यांच्या माध्यमातून या उपक्रमास 14 फेब्रुवारी 2016 रोजी प्रारंभ झाला. आपण आरोग्यासाठी का धावले पाहिजे, यासाठी वेळोवेळी ठिकठिकाणी जनजागृती करत धावण्यासाठी उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न या गृपच्या माध्यमातून होत आहे. धावण्याचा उपयोग काय?, याचा जास्त फायदा कुणाला होतो ?, योगा व धावण्यातील फरक, एक जळगावकर धावपटू कसा बनू शकतो?, गृप सदस्यांच्या अडचणी, शहरात धावणारांना प्रोत्साहनासाठी प्रयत्न व सुविधांचा आभाव, वैयक्तिक धावणे व सामूहिक धावण्यातील फरक, हृदयाची गती वाढविण्यासाठी काय केले पाहिजे : अशा मुद्द्यांचा खुलासा अनौपचारीक गप्पांमध्ये जळगाव रनर्स गृपने जनशक्तिशी बोलतांना केला. या चर्चासत्रात डॉ. विवेक पाटील, अविनाश काबरा, डॉ. रवि हिरानी, डॉ. प्रशांत देशमुख, किरण बच्छाव, विक्रांत सराफ आणि डॉ. तुषार कोठावदे यांची उपस्थिती होती.

उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचा परिसर योग्य कसा?
उमवि परीसरात धावण्यासाठी रहदारीचा, सकाळी धावताना कुत्र्यांचा त्रास नाही, परीसरात भरपूर झाडे असल्यामुळे 100 टक्के ऑक्सीजन मिळतो,अडचणी नसल्याने सुरक्षित धावता येतेेम्हणून या गृपने हा परिसर निवडले आहे. सुरूवातील सहाच जण पुढच्या तीन महिन्यात 100 पर्यंत गेले आणि आता एका वर्षात 170 जण या गृपमध्ये आहेत. त्यात 40-45 महिला, मुले, वयोवृद्धही आहेत. सरावानंंतर आत्मविश्‍वास वाढल्य नेकाही ठिकाणी मॅरेथॉनच्या स्पर्धांमध्ये हे सदस्य सहभाग घ्यायला लागले. जवळपास 40 लोकांनी देशात विविध ठिकाणी स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. फेसबुक पेज तयार करून रविवारच्या अ‍ॅक्टीव्हीटीचे अपडेट हे सर्वजण एकमेकांंना देतात. शहरात जागृतीसाठी सिटी रनला सुरूवात केली. महिला दिनी सकाळी 250 महिलांना सहभाग घेतला होता. लोकांमध्ये आता जागृती होत आहे. उमविने गृपच्या मदतीने शहरात अशे स्पर्धांच्या आयोजनासाठी हिरवा कंदील दिला आहे.

जळगाव शहरात सुविधांचा आभाव
इतर शहरांमधील रनर्स गृप पैसे घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र जळगाव रनर्स गृप समाजाचा काही देणे लागतो ही भावना ठेवून स्वार्थ न बघता काम करतो. शहराची धुळे, नाशिकशी तुलना केली तर सुविधांचा अभाव ठळकपणे दिसतो. इतर शहरांत धावण्यासाठी व धावण्याला चालना मिळावी यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उदा. हिरवळ, बगीचा, चांगले रस्ते आहते. मात्र जळगावात स्टेडीयम व विद्यापिठ सोडले तर कोठेच धावण्यासाठी योग्य जागा नाही. नियोजनही अद्यापर्यंत केलेले नाही. तरीही जळगाव रनर्सच्या माध्यमातून जळगावकरांचा सहभाग वाढत असल्याचे किरण बच्छाव यांनी सांगितले.

धावण्याचे शरीरासाठी होणारे फायदे
रनिंगमुळे हृदयाच्या स्नायूंना चांगला फायदा होतो. हृदयाचे ठोके वाढतात व स्नायूंची ताकद वाढते, 60 टक्के लोक वजन कमी करण्यासाठी रनिंग करतात. एक सामान्य व्यक्ती रनिंगमध्ये साधारणपणे 1000 कॅलरी बर्न करत असते. साहजिकच वजन कमी होऊन माणूस वेगाने धावतो. शरीराने घेतलेल्या कॅलरी आणि शरीर वापरत असलेल्या कॅलरी यात रनिंगमुळे संतुलन राहते, व्यायाम न केल्याने हाडे कमकुवत होतात. वेळीच काळजी घेतली नाही, तर हाडे ठिसूळदेखील होऊ शकतात. याचे उदाहरण म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. नियमित रनिंग केल्याने हाडांची ताकद वाढते, श्‍वासोच्छवासामध्ये सुधारणा होते. श्‍वासोच्छवासाला मदत करणार्‍या स्नायूंची ताकद वाढते. रनिंगमुळे श्‍वासोच्छवासाची क्षमता वाढते, जलद धावण्यासाठी ऊर्जा लागते, ती कर्बोहायड्रेडपासून मिळते; सावकाश धावण्यासाठी लागणारी ऊर्जा फॅट्समधून मिळते. साठवलेले फॅट्स स्लो रनिंगमध्ये वापरले जाते, त्याला फॅट बनिर्ंग म्हणतात. त्यामुळे वजन कमी होऊन शरीर सुडौल बनते, नियमित रनिंगमुळे मानसिक तणाव दूर राहू शकतात. मनःस्थिती चांगली राहते. माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. मानसिक थकवा जाणवत नाही. सर्वांगाला व्यायाम मिळत असल्यामुळे झोपही चांगली लागते. मानसिक स्वास्थ्यासाठी झोप अतिशय उपयुक्त असत रनिंगमुळे शरीरात अनेक बदल होतात. रनिंगमुळे स्ट्रोक, हार्ट अ‍ॅटॅक, रक्तदाब, मधुमेह, पाठदुखी अशा आजारांपासून दूर राहणे शक्य असते. त्यासाठी रनिंगविषयी नीट माहिती हवी.

डॉ.रवि हिरानींना गिनीजकडून प्रमाणपत्र
डॉ. रवि हिरानी यांनी सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत 4 हजार 81 जणांचा सहभाग होता. जिल्ह्यातून डॉ. हिराणी एकमेव सहभाग नोंदवला होता. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा होते. त्यात 18 सप्टेंबर 2016 रोजी जळगावच्या रनर्स ग्रुपचे संस्थापक डॉ. रवि हिरानी सहभागी झाले होते. ही स्पर्धा घाटातील अत्यंत कठीण आणि स्पर्धकाला दमवणारी असते. जिद्द व चिकाटीच्या बळावर डॉ. हिरानी यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. याबाबत त्यांना लंडनच्या गिनीज बुक कार्यालयातून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच डॉ. हिरानी आणि स्वप्नील मराठे यांनी धुळे-नाशिक-शिरपूर-धुळे असा 400 किमीचा सायकलींग प्रवास अवघ्या 25 तासात पुर्ण केले आहे.

किरण बच्छाव 21 किलोमिटर धावू शकतो मग आपण का नाही? असा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर आपणही आपल्या आरोग्यासाठी धावले पाहिजे. त्यासाठी सहा समविचारी लोक एकत्र भेटल्यानंतर ‘जळगाव रनर्स गृप’ नावाने व्हॉट्सअ‍ॅप गृप तयार केल्यानंतर किरण बच्छाव, डॉ. रवि हिरानी, अविनाश काबरा, निलेश भांडारकर, विक्रांत सराफ, नरेंद्रसिंग सोलंकी हे 14 फेब्रुवारी 2016 रोजी एकत्र जमल्यानंतर धावण्याचे ठरविले. सुरूवातीला बहिणाबाई चौधरी उद्यान ते शिवाजी महाराज पुतळा रिंगरोड मार्गे धावण्यास सुरूवात केली. ंनतर दर रविवारी शहराबाहेरील रोडवर धावण्याची तयारी सुरू केली. भुसावळरोड, शिरसोलीरोड, औरंगाबाद रोड, उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ परीसरात अथवा कानळदा रोड निवडले. या रस्त्यांवर धावण्यासाठी लोक सहभागी होत होते. नंतर सर्वांनी उमवि परीसरातच रविवारी धावण्याचे ठरविल्यांतर सहा जणांमधील प्रत्येकाने किमान पाच व्यक्ती जोडायचे हा संकल्प केला.
डॉ. रवि हिरानी

प्रत्येक जळगावकर चांगला रनर बनू शकतो
रनरमध्ये इच्छाशक्ति आवश्यक आहे. त्यात जाड- बारीक अंगकाठी, पायाला , हाताला त्रास, डायबेटीस , ब्लडप्रेशर असेल तरी इच्छाशक्ती असली तर तो काहीही करू शकतो. या गृपमध्ये नविन व्यक्तीला पाहिल्या दिवसापासून टिप्स देतात. साधारण चाळीसव्यावर्षी स्थूलपणा येतोे. शहरात सराव करतांना अनेक अडचणी आल्या. प्रामुख्याने बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, महाबळ भागात कधी कुत्र्यांचा , सकाळी कचरा जाळतांना होणारा त्रास, बसस्थानक व रेल्वे स्थानक परीसरात धावतांना अपडाऊंन करणार्‍यांचा त्रास, शिरसोली रोडवर जैन इरिगेशनची सकाळची शिप्टची वेळ यामुळे अनेक अडचणी आल्या, मात्र इच्छाशक्तीने त्यावर मार्ग काढला.
किरण बच्छाव

वैयक्तिक व सामूहिक धावण्यातील फरक
वैयक्तिक धावतांना होणार्‍या चुका आपल्या लक्षात येत नाही. आपण कसे धावतो, काय केले पाहिजे काय नको हेे काहीच समजत नाही. मात्र एकत्र धावतांना एक स्पर्धा निर्माण होते. आपल्यापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती आपल्यपेक्षा चांगल्या पद्धतीने धावू शकतो मग आपण का नाही या जाणिवेने जिद्द वाढते. चुकीचे काही होत असेल तर सोबतचे व्यक्ती चूक लक्षात आणून देतात. सुरूवातीला चालणे, त्यानंतर जोरात चालणे, मग हळूहळू पळणे यावर मार्गदर्शन केले जाते. सहसा नवीन व्यक्तीला पुढे धावण्याची मुभा दिली जाते. जूने सभासद मागे राहतात. मग त्याला योग्य मार्गदर्शन केले जाते.
अविनाश काबरा

योगा व रनिंग पुरक
पायांवर जोर दिला तर अधिक फायदा आहे. स्पर्धेची तयारी करण्यासाठी आणि शरीराचा फिटनेस चांगला राहतो. फक्त फिटनेससाठी तुम्ही धावत असाल तर दर रविवारी धावले तरी चांगले आहे. स्पर्धेसाठी जीम अ‍ॅक्टीव्हीटी वाढविली पाहिजे. गृपच्या माध्यमातून सहभाग घेणार्‍यांनी नोंदणी केली आणि काही जणांनी सहभाग नोंदवलाही आहे. त्यामुळे विकी थाईस पाळाव्या लागतात. योगा व रनिंग एकमेंकांना पुरक आहेत. योगा व रनिंग या दोन्हींचे फायदे आहेत. रनिंगमुळे फिजीकल फिटनेस चांगले असते, धावत असतांना हार्टरेट वाढतात कॅलरीज जास्त बर्न होते. योगामध्ये कॅलरीज जास्त बर्न होत नाहीत मात्र लवचिकता वाढते, श्‍वसनाची क्षमता वाढते.
डॉ. प्रशांत देशमुख

हृदय गतीसाठी धावणे गरजेचे
खूप लोक नुसतेच चालत असतात, त्यांना असे वाटते की आपण खूप चालतो, मात्र चालणेे महत्वाचे नसून धावणेही गरजेचे आहे. चालतांना हृदयाची गती पाहिजे तेवढी वाढत नाही. हृदयाला व्यायाम द्यायचा असेल तर हार्टरेट साधारण 110 ते 130 प्रमाणे वाढला पाहिजे. नुसते चालण्याने उपयोग होत नाही त्याने हृदयाला गती मिळत नाही. हार्टरेट वाढला तरच हृदयाचे आयुष्य वाढते. रक्ताभिसरणाची ताकद वाढते,शरीराच्या सर्व भागाना रक्त पुरविले तर प्रकृती चांगली राहते. सुरूवातीला धावतांना अडचणी निर्माण येतात मात्र नंतर धावण्याची सवय निर्माण होते. सोबतच्या व्यक्ती हे करू शकतात तर मी का करू शकत नाही या जाणिवेने माणूस पुढच्या व्यायामाला सुरूवातही करतो.
डॉ. विवेक पाटील

जळगाव रनर्स गृप एक चळवळ
शहरात लोकांनी आरोग्यासाठी धावावे, याबाबत जागृती करणे, हा एकच हेतू रनर्स गृपचा होता. वर्षभरापासून गृप उत्कृष्ट काम करत आहे. ही एक चळवळ आहे. यात महिलांमध्ये धावण्याची व स्वतःकरीता धावणार याची उत्सुकता आहे. महिला धावल्या ही एक आमच्या गृपची महत्वाची उपलब्धी आम्ही समजतो. माझा मुलगाही दर रविवारी माझ्यासोबत धावण्यासाठी येत असतो. त्याची उत्सुकता पाहून मलाही जास्त धावण्याची प्रेरणा मिळते. आमच्या गृपमध्ये महिला, बालके व वृद्धांचाही सहभाग असल्याचे पाहून आम्हाला मोठा आनंद व समाधान आहे.
डॉ. तुषार कोठावदे

मानसिकता बदलली पाहिजे
शहरातील रनर्स व मुंबईतील रनर्स यांच्यात खूप मोठा फरक आहे. मुंबईत रनर्सला व सायकलपटूला एक मान दिला जातो. तो मान जळगाव शहरात दिला जात नाही. मोठ्या प्रमाणावर धावत असतांना सोबत पाण्याची व्यवस्था करता येत नाही. मुंबईत काही भाग असे आहे की रनर्स धावतात त्या ठिकाणी तहान लागली की मुंबईकर रनर्सकरीता पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या ठेवतात. ही मानसिकता जळगावकरांनी बदलली पाहिजे. मुंबईत धावपटू व सायकलपटू रस्त्यात दिसल्यावर वाहनचालक त्यांचे वाहन थांबवून किंवा वेग कमी करुन त्याला पुढे जाऊ देतात, जळगावात तसे होत नाही.
विक्रांत सराफ