रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीसोबत सेन्सेक्सही घसरला

0

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरु आहे. आज सकाळीही बाजार उघडताच शेअर बाजारात तब्बल ६०४ अंकांची घसरण झाली. सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स ३५,८२० अंकांवर होता.
सुरुवातीच्या काही मिनिटात घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स ३५,३०० अंकांवर पोहोचला. दुसऱ्या बाजूला डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही घसरण सुरु आहे. आज रुपया ७३.७७ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. काल रुपया ७३.३४ वर बंद झाला होता. रुपयामध्ये तब्बल ४३ पैशांची घसरण झाली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेटमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता आहे तसेच अमेरिकी डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाची घसरण सुरु आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाची प्रति पिंप किंमत ८५ डॉलरच्या पुढे गेली आहे. या कारणामुळे शेअर बाजारात घसरण होत असल्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला.

सोमवारच्या तुलनेत सेन्सेक्स बुधवारी५५०.५१ अंश घसरणीसह ३५,९७५.६३ पर्यंत खाली आला. तर सत्रात १०,८४३.७५ अंश नीचांक गाठल्यानंतर निफ्टी १५०.०५ अंश आपटीनंतर १०,८५८.२५ वर स्थिरावला. सत्रअखेर दीड टक्क्याने घसरलेल्या सेन्सेक्समुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या १.७१ लाख कोटी रुपये संपत्तीचा ऱ्हास झाला. सर्वात जुन्या भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्य १४३.७१ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.