पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रीय महामार्गाव राज्य मार्गालगतच्या 500 मीटर अंतरावरील परमिट रूम, बिअरबार, देशी दारू, बिअर शॉपीची दुकाने बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे भोर शहरातील व आसपासची पाच दुकाने, तर महामार्गावरील 26 अशी एकूण 31 दारूची दुकाने बंद झाली आहेत. मात्र, भोर शहरातील दोन वॉईनशॉप कायद्याच्या कचाट्यातून सुटल्याने भोर तालुक्यासह पुणे-सातारा महामार्गावरील व शिरवळ, खंडाळा येथील लोक दारूखरेदीसाठी शहरात गर्दी करत आहेत.
भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाड-पंढरपूर रोडवरील दोन बिअरबार व एक बिअर शॉपी अशी तीन, तर भोर-कापूरव्होळ रोडवरील दोन बिअरबार अशी पाच दुकाने, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील एक वॉईन शॉप, 14 बिअरबार व 11 बिशर शॉपी अशी 26 तर एकूण 31 दुकानांना उत्पादनशुल्क विभागाने सील लावले आहे.
ही दुकाने बंद झाल्याने कुठेच दारू मिळत नसल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. मात्र, खंडाळा येथे एक बिअरबार व भोर शहरातील दोन वॉईनशॉप सुरू असल्याने तालुक्यातील तळीरामांनी आपला मोर्चा या वॉईन शॉपकडे वळविला आहे. शासनाच्या या कारवाईनंतर अवैध देशी व हातभट्टी दारूविक्रीला मोठ्या प्रमाणात ऊत आल्याचे चित्र आहे.