श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा मिरवणूक उत्साहात

0

पुणे :- सदाशिव पेठेमध्ये श्रीमद् भागवत आनंदी जीवन अनुभूती सप्ताह सोहळ्यानिमित्त आयोजित मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी गोपाल कृष्ण भगवान की जय… चा जयघोष, रांगोळीच्या पायघडया… सनई-चौघडयाचे मंगल सूर आणि श्रीमद् भागवत ग्रंथ हाती घेऊन सहभागी झालेले भाविक अशा भक्तीमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. या मिरवणुकीमध्ये देवदेवतांच्या रुपात सहभागी झालेले चिमुकले हे या भागवत ग्रंथ मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.

निनाद, पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप मुलींच्या शाळेमध्ये भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी निरुपणकार धुळ्याचे प.पू.धनंजय देशपांडे, सोहळ्याचे यजमान सुरेंद्र वाईकर, भावना वाईकर, किरण वाईकर, अलका वाईकर यांसह शुभदा जोशी, वासंती कुलकर्णी, उदय जोशी, रामलिंग शिवणगे, बाबा शिंदे, कलातीर्थचे अमोल काळे आदी उपस्थित होते. चिमण्या गणपती चौक- करपे चौक – खुन्या मुरलीधर मंदिर- नागनाथ पारमार्गे रहाळकार राम मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकीत कलातीर्थ संस्थेच्या अमोल काळे यांचे बालकलाकार देव-देवतांच्या रुपात सहभागी झाले होते. रहाळकर राम मंदिर येथे श्री श्रीराम शैव (परभणी) यांच्या उपस्थितीत संस्कृतमध्ये संहिता वाचनाला देखील सुरुवात झाली. भागवत कथेला पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.