नवी दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी भोपाल मधील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना थोर देशभक्त असे म्हटले होते. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. दरम्यान आता साध्वी यांच्यावर नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी टीका केली आहे. महात्मा गांधी यांचे देशातील स्थान सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडचे असून, प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी देशातील आत्म्याची हत्या करीत आहे. भाजपने अशा लोकांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केली आहे.
नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती, तर प्रज्ञा सारख्या लोकांनी भारत देशातील आत्मा, अहिंसा, शांतता, सहिष्णुता यांची हत्या करत आहे असे त्यांनी आपल्या ट्वीटर द्वारे म्हटले आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या प्रचारा दरम्यान, महात्मा गांधीचे मारेकरी नथुराम गोडसे यांना थोर देशभक्त असे म्हटले होते. नंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर माफी मागितली होती, मला महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर आहे, त्यांचे देशाबद्दलचे कार्य कधी विसरता येणार नाही असे त्यांनी घुमजाव करत विधान केले होते.