भोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह या पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करायला व्हीलचेअरवर गेलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी प्रचारफेरीत भजनाच्या तालावर दंग होऊन ठेका धरला.
भोपाळमध्ये एका प्रचारफेरीमधील प्राज्ञासिंह यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रज्ञासिंह काही माहिलांबरोबर नाचताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी व्हीलचेअरवरुन जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पोहचलेल्या प्रज्ञासिंह संध्याकाळी प्रचारफेरी सहभागी झाल्या. या फेरीमध्ये त्या एका सिंधीबहुल परिसरामध्ये पोहचल्या. तेथील महिला भजनात दंग होऊन नृत्य करत होत्या. त्या महिलांनी प्रज्ञासिंह यांना आपल्यासोबत ठेका धरण्याचा आग्रह केला. प्रज्ञासिंह यांनाही भजनाच्या तालावर नाचण्याचा मोह आवरला नाही. या संदर्भातील वृत्त दैनिक भास्कर या हिंदी वेबसाईटने दिले आहे. एकीकडे उमेदावारी अर्ज दाखल करायला जाताना व्हील चेअरवर जाणाऱ्या प्रज्ञासिंह प्रचारामध्ये नाचू कशा लागल्या असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.