जळगावात बनावट सौंदर्यप्रसादनाची विक्री
फुले मार्केटमधून अडीच लाखाचा माल जप्त
जळगाव | प्रतिनिधी
नामांकित कंपनीच्या नावाने बनावट कॉस्मेटीक विक्री करणार्या फुले मार्केटमधील विक्रेत्यांकडून अडीच लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात व्यापार्या विरुध्द कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, नेत्रिका कन्स्टलटींग अॅण्ड इन्वेस्टीगेशन, मुंबई या कंपनीचे फिल्ड ऑफीसर सिध्देश सुभाष शिर्के हे हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे लॅकमे उत्पादनाच्या नावाने बनावट मालाची विक्री शहरात होत असल्याची माहिती मिळाल्यावरून खात्री करण्यासाठी बुधवारी शहरात आले होते. त्यांनी फुले मार्केटमध्ये कॉस्मेटीक दुकानाची तपासणी केली.
एमजी रोडवरील बळीराम पेठेतील साई प्लाझा संकुलातील शान नेक्स व सेंट्रल फुले मार्केट मधील शान जनरल या कॉस्मेटीक या दुकानात हिंदुस्तान युनिलिव्हरच्या लॅकमे या ब्रॅण्डचे वेगवेगळे उत्पादन व रॅटकिट कंपनीचे वीट हेअर रिमुव्हर क्रिम प्रॉडक्टसारखा बनावट व हलक्या दर्जाचा माल अस्सल असल्याचे बासवुन विक्रीला ठेवल्याचे आढळून आले. दोन्ही दुकानातील मिळून 2 ,58,031 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुकान मालक विपीन प्रताप वरयाणी (वय 33, रा. सिंधी कॉलनी, कंवरनगर) याला अटक करून त्याच्या विरुद्ध कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51 व 63 प्रमाणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.