जोधपूर : वृत्तसंस्था – सप्टेंबर 1998मधील बहुचर्चित काळवीट शिकारप्रकरणी बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान याला जोधपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. याच खटल्यातील अन्य आरोपी अभिनेता सैफअली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सलमानविरोधातील निकालपत्र तब्बल 196 पानांचे असून, त्याची रवानगी न्यायालयाने जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात केली. सलमानच्या वकिलांनी जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्याच्या जामीनअर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारची रात्र सलमानला तुरुंगातच काढावी लागली. न्यायालय शिक्षा सुनावत असताना सलमानच्या बहिणी अर्पिता व अलवीरा या न्यायालयात हजर होत्या. शिक्षा ठोठावली जाताच दोघींनीही रडारड करण्यास सुरुवात केली होती. दोषनिश्चिती झाल्यानंतर कमीत कमी शिक्षेचा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी केला होता. तर सरकारी वकिलांनी जास्तीत जास्त शिक्षेसह किमान सहा वर्षाच्या शिक्षेची मागणी केली होती.
न्यायालयात दोन्हीबाजूने जोरदार घोषणाबाजी
जंगली प्राणी संरक्षण कायद्यानुसार काळवीट शिकारप्रकरणी सलमानला दोषी ठरविण्यात आलेले आहे. त्याला शिक्षा सुनावताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व जोधपूर मध्यवर्ती कारागृहात नेले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन कोठडी देण्यात आली. दुसरीकडे, जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयात त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. सलमानला शिक्षा होताच न्यायालयात उपस्थित बिश्नोई समाजाच्या नागरिकांनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सलमानच्या समर्थकांनीदेखील सलमानच्या समर्थनार्थ नारे दिले. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करून दोन्ही गटांना न्यायालयातून हटविले. या खटल्यातून निर्दोष सुटलेले सैफअली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्र व दुष्यंत कुमार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा बिश्नोई समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. हम साथ साथ है या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान सलमानसह इतरांनी काळवीटाची शिकार करून त्याच्या मटणावर ताव मारल्याचा आरोप झालेला आहे. त्यात सलमान हा दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे.
काळवीट शिकारप्रकरणाचा घटनाक्रम
1. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरनजीकच्या कांकाणी गावाजवळ दोन काळवीटांची सप्टेंबर 1998 मध्ये शिकार. शिकार करताना लोकांनी पाहिल्यानंतर सलमानसह सात जण जिप्सीतून फरार झाले.
2. 2 ऑक्टोबर 1998ला राजस्थानच्या वनविभागाकडे तक्रार दाखल. सलमान, सैफअली खान, तब्बूसह सात जणांना आरोपी बनविले. चार प्रत्यक्षदर्शींनी पुरावे दिले.
3. 9 नोव्हेंबर 2000 ला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावणीस सुरुवात केली. 19 फेब्रुवारीला सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले. परंतु, बचाव पक्षाने सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. तर सरकार पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली. परिणामी सात वर्ष सुनावणी थांबली.
4. 23 मार्च 2013ला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सर्व आरोपींवर पुन्हा आरोप निश्चित केले. 23 मे 2013रोजी पुन्हा सुनावणीस सुरुवात झाली. त्यात 28 साक्षीदार फितूर झाले.
5. 13 जानेवारी 2017 रोजी साक्षी व पुरावे सुनावणी पूर्ण तर 27 जानेवारीला सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा जबाब घेण्यात आला.
6. 13 सप्टेंबर व 28 ऑक्टोबर 2017 ला सरकारी पक्ष व बचाव पक्षाने अंतिम युक्तिवाद केला.
7. 24 मार्च 2018 ला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला व 28 मार्चला न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला.
8. 5 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाने सलमानला दोषी ठरवित शिक्षा ठोठावली, इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली.