भुसावळ प्रतिनिधी l
येथील सार्वजनिक वाचनालयात शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थिनी समृद्धी तोडकर हिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन 6 जूनचे औचित्य साधून भुसावळ येथील कोर्टासमोरील दीडशे वर्षाची ज्ञानदानाची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्यासह सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर, संचालक हरीश पाटील, सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर यांची सुकन्या व सेंट अलॉयसिस हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी तोडकर हिने दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांनी तिचे कौतुक केले. डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाची महती सांगून यंदा आपण 350 वर्षपूर्ती साजरी करत असल्याचेही ते म्हणाले. ललितकुमार फिरके यांनी समृद्धी तोडकर हिचे कौतुक करून तिला भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांनी तर आभार ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी मानले. यावेळी वाचक वर्ग उपस्थित होता.