जिल्हा न्यायालयाचा निकाल ; ट्रॅक्टर थांबविल्याने जीवे मारण्याचा केला होता प्रयत्न
जळगाव :- रिंगणगाव तलाठी अनिल प्रभाकर सुरवाडे व घनश्याम सुधाकर पाटिल यांनी वाळू चोरी करणार्या ट्रॅक्टर थांबविल्याने दोघांच्या अंगावर ट्रॅक्टर टाकून नेवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 13 नोव्हेंबर 2013 रोजी घडली. धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवित मुख्य दोन संशयितांना 7 वर्ष सश्रम कारावास प्रत्येकी 15 हजार दंड तर इतर दोघांना 2 वर्ष प्रत्येकी 25 हजार रुपये दंड, अशी सुनावली आहे. जिल्हा प्रमुख व सत्र न्या. गोविंदा सानप यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. गुन्ह्यातील दोन्ही ट्रॅक्टर सुद्धा न्यायालयाने खटल्यात जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रॅक्टर सोडून झाले होते पसार
वैजनाथ शिवारात 13 नोव्हेंबर 2013 सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास महसुल विभागाच्या पथकातील तलाठी घनश्याम सुधाकर पाटील आणि अनील प्रभाकर सुरवाडे या दोघांनी गिरणा नदिपात्रातून बेकादेशीर उत्खनन करुन चोरटी वाहतुक करणार्या दोन ट्रॅक्टर थांबण्याचा इशारा केला. दोघां ट्रॅक्टर चालकांनी वाहन न थांबवता मागील ट्रॅक्टर चालकाच्या चिथावणीवरुन रमेश काशिनाथ सोनवणे, गुलाब बाबुलाल मोरे यांनी सुसाट वेगात विनांबरचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली क्र.(एमएच.19.ए.एन.6836) चालवून समोरील तलाठ्यांच्या अंगावर नेले. ट्रॅक्टरची धडक लागल्याने अनील सुरवाडे यांचा एक हात ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली येवून त्यांना गंभीर दुखापत झाली. त्या मागेच (एमएच.19.ए.एन.3479) हे ट्रॅक्टर असे अपघातानंतर दोन्ही ट्रॅक्टर चालक वाहने सोडून पळून गेले. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल सुरवाडे यांच्या तक्रारीवरुन रमेश काशिनाथ सोनवणे, गुलाब बाबुलाल मोरे, दिपक संतोष पाटिल, रविंद्र विक्रम हटकर यांच्या विरुद्ध धरणगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
अशी कलमे अशी शिक्षा
पोलिस निरीक्षक एम.जी. बनकर, विपीन शेवाळे यांनी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्या. गोविंदा सानप यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सरकारपक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार साक्षी नोंदविण्यात आले. यात रमेश काशिनाथ सोनवणे-गुलाब बाबुलाल मोरे रा. हरिविठ्ठल नगर, हे दोघे (प्राणघातक हल्ला कलम- 307,34 अन्वये 7 वर्षे सश्रम कारवास प्रत्येकी पंधरा हजार दंड, दंड भरल्यास सहा महिने साधी कैद, (कलम-333,34) अन्वये दोन वर्षे सश्रम कारवास प्रत्येकी सात हजा रुपये दंड दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, कलम-338, 34 अन्वये 1 वर्षाचा सश्रम कारवास प्रत्येकी 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने कैद, कलम-354 अन्वये 1 वर्ष साधी कैद प्रत्येकी 2 हजार दंड, दंड न भरल्यास 2 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. मुख्य संशयितांससह दिपक संतोष पाटिल व रविंद्र विक्रम हटकर दोघे रा. वाघनगर, या दोन जणांना विना परवाना चोरटी वाळूची वाहतूक केल्या प्रकरणी कलम-379 अन्वये दोषी धरुन 2 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.