सनी देओलने भरला उमेदवारी अर्ज !

0

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी मागील आठवड्यात भाजपात प्रवेश केला. दरम्यान आज त्यांनी पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सनी देओलभाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सनी देओल यांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरताना पगडी परिधान केली होती. तसेच, त्यांनी ‘अजय सिंह देओल’ या नावाने अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते. तसेच, सनी देओल यांचा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल यांनीही हजेरी लावली होती.

गुरुदासपूर मतदार संघातून अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. सनी देओलसमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत.

सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपाशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत: ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत होते, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेता सनी देओलने काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी सनी देओलसोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर करत, आम्ही दोघेही ‘हिंदुस्थान जिंदाबाद था, है, और रहेगा’साठी एकत्र असल्याचे म्हटले होते.