पुण्यात भाजपचे चार आमदार डेंजर झोनमध्ये!

0
खा. संजय काकडे यांची माहिती : पुण्यात भाजपचे तिकीट मिळण्याचाही दावा 
दैनिक जनशक्तिचे वृत्त तंतोतंत खरे : लोकसभा निवडणूक लढविण्याची खा. काकडेंची घोषणा
 
पुणे : ‘संजय काकडे भाजपकडून लोकसभेच्या मैदानात उतरणार’ असल्याचे वृत्त दैनिक जनशक्तिने शनिवारच्या अंकात प्रकाशित करताच, शनिवारीच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील लोकसभेची निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ‘जनशक्ति’चे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. माझे मेरिट, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीत भाजप मला पुण्यातून उमेदवारी देईल, असे सांगून काकडे यांनी, या निवडणुकीत आपण साडेतीन लाखापेक्षाअधिक मताधिक्क्याने निवडून येऊ, असा दावाही केला. या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःच केलेल्या सर्वेक्षणातील काही निरीक्षणेही प्रसारमाध्यमांसमोर मांडली. त्यात पुण्यातील भाजपच्या विधानसभेच्या आठपैकी चार जागा या डेंजर झोनमध्ये असल्याचे सांगितले. काकडेंच्या या दाव्यामुळे भाजपच्या खासदारानेच आमदारांची विकेट घेतल्याचे बोलले जात आहे.
खा. अनिल शिरोळेंचा पत्ता कट होणार?
काँग्रेसचे पदच्युत नेते सुरेश कलमाडी यांच्यासह रिपाइंचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह इतर नेत्यांच्या भेटीगाठीचा सपाटा लावलेले खासदार संजय काकडे हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त शनिवारच्या अंकात दैनिक जनशक्तिने प्रकाशित केले होते. या वृत्तात विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. हे वृत्त प्रकाशित होताच, शनिवारीच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेत, लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. खा. काकडे म्हणाले, आगामी निवडणुकीत पुण्यातून आपणास लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी इच्छा मी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. भाजप माझी ही मागणी नक्की मान्य करून मला खासदारकीचे तिकीट देईल. पुण्यातील प्रत्येक भागात असलेले माझे नेटवर्क आणि तरुण कार्यकर्त्यांचा मला असलेला पाठिंबा पाहाता, विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी मला उमेदवारी मिळायला हवी. माझे मेरिट आणि आतापर्यंतचे काम पाहाता मला भाजप नक्कीच उमेदवारी देईल. या निवडणुकीत मी साडेतीन लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून येईल, असा विश्‍वासही यावेळी खा. काकडे यांनी व्यक्त केला.
पुण्यात खा. काकडेंकडून खासगी सर्वेक्षण
आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठपैकी चार भाजप आमदारांचे भवितव्य धोक्यात असल्याचा इशाराही खा. संजय काकडे यांनी दिली. पुण्यात खासगी सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष हाती आल्याचेही त्यांनी सांगितले. डेंजर झोनमधील आमदारांची नावे मात्र त्यांनी जाहीर केली नाहीत. या आमदारांची निष्क्रियता हा त्यातील महत्वाचा भाग असून, आता जी यंत्रणा सुरु केली आहे, त्यामुळे चित्र बदलू शकते. तसेच, या चारही जागांसाठी मेहनत घेऊ, असेही खा. काकडे यांनी सांगितले. खा. काकडे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. मी पक्षाचा सच्चा सैनिक आहे. त्यामुळे पक्ष घेईल तो निर्णय आपणास मान्य असेल.
– अनिल शिरोळे, खासदार पुणे