पुणे : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार तथा ज्येष्ठ उद्योगपती संजय काकडे यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून ते पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर जोरदार फिल्डिंगही लावली आहे.
खा. काकडे यांच्या भूमिकेने विद्यमान खासदार अनिल शिरोळे व खासदारकीसाठी इच्छुक असलेले पालकमंत्री गिरीश बापट यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. खासदार म्हणून शिरोळे यांना पुण्यात आपला प्रभाव पाडता आला नाही. तसेच, खासदारकीसाठी भाजपमधून नऊ दिग्गज उमेदवार इच्छूक आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यात खा. काकडे यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्त तरी खा. काकडे यांनी पुण्यात भेटीगाठी व बैठका सुरु केल्या असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
कलमाडींसोबतच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
काँग्रेसचे पदच्युत नेते व पुण्यातील दिग्गज राजकारणी सुरेश कलमाडी यांची खा. संजय काकडे यांनी नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वाढदिवसानिमित्त ही भेट होती, असे सांगितले जात असले तरी या भेटीवर कलमाडी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खा. काकडे यांना खासगीत मार्गदर्शन केले. या शिवाय, खा. काकडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनादेखील नुकतेच स्नेहभोजन दिले होते.
हे देखील वाचा
भाजपमध्ये खा. काकडे यांचे वजन चांगलेच वाढले असून, खासदारकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः त्यांच्यासाठी अनुकूल आहेत. या शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतदेखील त्यांचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील राजकीय गणिते बदलविण्याची क्षमता खा. काकडे यांच्याकडे आहे.
आपण लोकसभेसाठी इच्छुक असून, त्या दृष्टीकोनातून पुणे मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्या आहेत, अशी कबुलीच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे नऊ महिने बाकी असून, त्यापैकी तीन महिने तर आचारसंहिताच लागू असते. परिणामी, केवळ सहा महिने खर्याअर्थाने लोकसभा निवडणुकीसाठी बाकी आहेत, असेही खा. काकडे यांनी सांगितले. वेळ कमी असल्याने आपण स्वतःच पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपकडून नऊजण इच्छुक!
खा. काकडे यांच्यासह पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी एकूण नऊजण इच्छुक आहेत. त्यात पालकमंत्री गिरीश बापट, विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा समावेश आहे. या दिग्गजांच्या चुरशीत भाजपची उमेदवारी खा. काकडे यांना मिळते का, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. पुणे महापालिकेत सत्ता आणण्यासाठी खा. काकडे यांनी केलेले काम, शहरात भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, तसेच जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपला पुरविलेली रसद पाहाता पुण्यातून उमेदवारीसाठी खा. काकडे यांचे पारडे तूर्त तरी जड आहे.
विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना खासदार म्हणून आपला प्रभाव पाडता आला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुणे शहरात विकासाच्या अनेक योजना सुरु झाल्यात. या योजनांचे श्रेयदेखील त्यांना घेता आले नाही. त्यामुळे भाजपश्रेष्ठी खा. शिरोळे यांना पुन्हा उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत नाही. जातीय समिकरणे साधण्यासाठी खा. शिरोळे यांना मागीलवेळी उमेदवारी देण्यात आली होती. तीच समिकरणे खा. काकडे यांना उमेदवारी दिल्यानेही साधली जाणार आहेत, अशी माहितीही भाजपच्या वरिष्ठस्तरीय नेतृत्वाने दिली आहे. या शिवाय, काकडे यांना पुण्यातील मराठा मतांसह दलित, ओबीसी मतांचेदेखील समर्थन असल्याचे सूत्राने सांगितले.