राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
जळगाव – एरंडोल तालुक्यातील वैजनाथ टाकरखेडे येथील सावखेडे वाळुगटामार्फत मोठ्या प्रमाणावर वाळुचे अवैध उत्खनन होत असुन हा ठेका रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा-एरंडोल मतदारसंघातील वैजनाथ टाकरखेडा या भागात सावखेडा वाळुगटामार्फत गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वाळुचे अवैधरित्या उत्खनन केले जात आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळाची परिस्थीती असतांना तेथील शेतकर्यांनी वारंवार तक्रार करूनही त्या भागातील वाळुचे उत्खनन थांबले नाही. त्याठिकाणी २५ ते ३० फुटाचे खोल खड्डे होतील अशा पध्दतीने सर्रासपणे वाळुचे अवैधरित्या उत्खनन करणे सुरूच आहे. या वाळू उत्खननाकडे विभागातील अधिकारी व कर्मचार्यांचे मोठे दुर्लक्ष होत आहे. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे. तरी याबाबत गंभीर दखल घेऊन आपल्या स्तरावरून हा ठेका रद्द करण्याची कारवाई करावी व वाळुचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केली आहे.