मुंबई-देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. या नियमांनुसार आता एसबीआय एटीएम धारकांना एका दिवसात फक्त २० हजार रुपये काढता येणार आहेत. आधी ही मर्यादा ४० हजार रुपये एवढी होती. आजपासून हा नियम लागू होणार आहे. एसबीआयच्या क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्ड धारकांसाठी हा नियम असणार आहे. बँकेकडून सर्व शाखांना याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.
जर एखाद्याला एका दिवसात २० हजाराहून जास्त पैसे काढायचे असतील तर उच्च श्रेणीतील कार्डसाठी अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. ‘ग्लोबल इंटरनॅशनल कार्ड’ आणि ‘प्लॅटिनम कार्ड’च्या मर्यादेत बदल करण्यात आलेला नाही. ग्लोबल इंटरनॅशनल कार्ड धारकांना दिवसाला ५० हजार आणि प्लॅटिनम कार्ड धारकांना १ लाखापर्यंतची रक्कम काढण्याची मुभा आहे.