नवी दिल्ली-सध्या सीबीआयमध्ये भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणावरून रणकंदन माजले आहे. वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. दरम्यान आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले असून एका कंत्राटदाराला नियम डावलून पाच कोटी रुपये दिल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी रात्री ‘एचएएल’मधील सात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील सात अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराला जानेवारी ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत पाच कोटी रुपये अदा करण्यास मंजुरी दिली. मात्र, ही मंजुरी देताना नियम डावलण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
७० वर्षापासून लढाऊ विमान बांधणीचे काम करणारी ‘एचएएल’ राफेल घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे. राफेल खरेदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला घेरण्याची रणनीती आखली आहे. ‘एचएएल’ला पूर्वीच्या करारान्वये मिळणारे कंत्राट मोदी सरकारने रिलायन्सच्या घशात घातले, असा काँग्रेसचा आरोप आहे.