मुंबई: देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी देशातील अग्रणी असलेली बँक एसबीआयच्या खातेधारकांकडे असलेल्या ९० कोटी एटीएम, डेबिट कार्ड बंद करण्याची योजना आखली आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक लवकरच एटीएम मधून डेबिट कार्डशिवाय पैसे काढू शकतील. एसबीआय लवकरच सर्व डेबिट कार्ड मागे घेणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी दिली.
बँकेचे ग्राहक डिजिटल पेमेंट सेवेच्या माध्यमातून रोख रक्कम काढू शकतील. पुढील 18 महिने बँक या योजनेवर काम करणार आहे. देशातल्या डिजिटल पेमेंट सेवेला चालना देण्यासाठी एटीएम कार्ड मागे घेण्याचा निर्णय एसबीआयनं घेतला आहे. डेबिट कार्ड बंद झाल्यानंतर एसबीआयचे ग्राहक योनोच्या माध्यमातून पैसे काढू शकतील. योनो एसबीआयचं अॅप आहे. या माध्यमातून ग्राहक अतिशय सोप्या पद्धतीनं एटीएममधून रोख रक्कम काढू शकतील. यामुळे एटीएम कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळता येईल. सोबतच ग्राहकांना एटीएम कार्ड स्वत:जवळ बाळगण्याची गरजदेखील भासणार नाही, असं बँकेनं म्हटलं आहे.
योनो अॅपच्या माध्यमातून ग्राहक पैसे काढण्यासोबतच शॉपिंगदेखील करू शकतात. डेबिट कार्ड बंद करण्याच्या दृष्टीनं एसबीआयनं देशात 68 हजार ‘योनो कॅशपॉईंट’ सुरू केले आहेत. पुढील 18 महिन्यांत एसबीआय योनो पॉईंट्सची संख्या 10 लाखांपर्यंत नेणार आहे. या व्यवहारासाठी मोबाईलवर योनो अॅप डाऊनलोड करा. अॅप सुरू झाल्यानंतर योनो कॅश कॅटेगरी निवडा. रक्कम भरा (जितकी रक्कम तुम्हाला काढायची आहे). डिजिटल व्यवहार पिनसाठी क्लिक करा. रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर व्यवहार (ट्रॅन्झॅक्शन) पिन मिळेल. रोख रक्कम काढण्यासाठी कोणत्याही योनो एटीएमवर पिन नंबर टाका