- भुसावळ प्रतिनिधी l
जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कूलच्या मध्ये वारकरी सांप्रदायातील आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद यांचा एकत्रितरित्या कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रथमत विद्यार्थी भावेश पाटील व कुश चौधरी यांचे हस्ते विठ्ठल आणि रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यालयाच्या उपशिक्षिका पुनम महाजन यांनी बकरी ईद निमित्त मार्गदर्शन केले. यात या पवित्र सणाचे स्वरूप स्पष्ट करत मुस्लिम बांधवांमधील या सणाचे महत्त्व सांगितले; तसेच बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर उपशिक्षिका स्नेहल ब-हाटे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगताना वारकरी संप्रदायाचा अलौकिक वारसा आणि आषाढी एकादशीचे महत्त्व यावर भाष्य करत पंढरपुरातील आनंद व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा धारण करून त्यांचे अभंग गायन केले. यात संत ज्ञानेश्वर- मनिष चौधरी, संत तुकाराम- ऋषभ नारखेडे, संत नामदेव- आदित्य मगरे, संत एकनाथ-गितेश नेहेते ,संत गोरोबा- गोपाल अग्रवाल, संत चोखामेळा- भावेश पाटील, संत मुक्ताबाई- तेजल महाजन, संत जनाबाई – रुचिका बोरोले यांनी भूमिका पार पाडली. यानंतर इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी पाऊले चालती पंढरीची वाट आणि विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी काढली व रिंगण करून फुगड्यांचे घेर धरले.
कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मोझेस पी जाधव, पर्यवेक्षिका पुनम नेहेते, विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका शितल कोलते यांनी केले. तर उपशिक्षिका कविता चौधरी यांच्या आभाराअंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.