मुंबई: वेब सिरीजच्या दुनियेतील अफलातून अशी वेब सिरीज म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’. ‘सेक्रेड गेम्स1’ प्रेक्षकांना प्रचंड भावली. आता दुसरा भाग कधी येणार याची आतुरता प्रेक्षकांना आहे. अखेर प्रतिक्षा संपली आहे. ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होणार आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच या दुस-या सीझनचा ट्रेलरही दमदार आहे. रक्तपात, शिव्या, हिंसा असे सगळे काही यात आहे. 2 मिनिटे 10 सेकंदांचा हा ट्रेलर पाहिल्यानंतर ‘सेक्रेड गेम्स 2’ची कथा पहिल्या सीझनपेक्षा अधिक रोमांचक असणार, याची खात्री पटते. ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी आणि सैफ अली खान हे त्रिकुट जबरदस्त अवतारात दिसते. नेटफ्लिक्सने हा ट्रेलर शेअर केला आहे. ‘बोले तो गेम ओवर’, असे हा ट्रेलर शेअर करताना लिहिले आहे.
‘सेक्रेड गेम्स 2’चे किती एपिसोड पाहायला मिळणार, हे अद्याप कळलेले नाही. पण पहिल्या सीझनप्रमाणेच हे दुसरे सीझनही गाजणार, इतके मात्र स्पष्ट दिसतेय. या सीरिजमध्ये सैफने मुंबईचा पोलिस इन्स्पेक्टर सरताज सिंगची भूमिका साकारली आहे तर नवाजुद्दीनने गणेश गायतोंडेची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. पंकज त्रिपाठी गुरजीच्या भूमिकेत आहेत. ‘सेक्रेड गेम्स’ चे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी दोघांनी मिळून केले होते. पण दुस-या सिझनमध्ये विक्रमादित्यची जागा नीरज घयवानने घेतली आहे. ‘सेक्रेड गेम्स’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. ही वेबसीरिज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत आहे.