श्रीनगर-काश्मीरमध्ये गेल्या सात महिन्यात जवळपास ७० दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सुरक्षा दलाने आता दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सुरक्षा दल यापुढे नव्याने दहशतवादी संघटनेत भर्ती झालेल्या तरुणांना जिवंत पकडून, आपल्या कुटुंबाकडे परतण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
समुपदेशन करणार
मुळापासून दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा पोलीस आणि सुरक्षा दलाचा प्रयत्न आहे. तरुणांना कट्टरवादी बनवून जिहादकडे ढकलण्यासाठी होणारा प्रयत्नच हाणून पाडण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यांना जिवंत पकडण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यांची मूळ समस्या जाणून घेण्याकडे कल असेल. एका १५ ते १६ वर्षाच्या तरुणाचे इतकंही ब्रेनवॉश केले जाऊ शकत नाही की तो थेट चमककीत सहभागी होऊन मृत्यूला कवटाळण्यास तयार होईल. नक्कीच याची दुसरी बाजू असणार, असे मत एका अधिकाऱ्याने नोंदवले आहे.
एकीकडे रमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई न करण्याचा आदेश केंद्राने दिला असताना, काही कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा करणे आवश्यक होते. सद्दाम, इसा फाजिली आणि समीर टायगर यांच्यावर लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीनमध्ये तरुणांची भर्ती करण्याची मुख्य जबाबदारी होती. काही मुख्य दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आता मात्र लष्कराने आपल्या धोरणात बदल केला आहे असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.