मुंबई: शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ सलग तिसऱ्यांदा घसरणीने झाला. त्यानंतरही बाजार मंदीतच होता. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. अर्थमंत्र्यांनी कंपनी कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी आली आहे. आज सेंसेक्समध्ये घसघसीत 1400 अंकांची वाढ झाली आहे. 1400 अंकांच्या वाढीश सेंसेक्स 39 हजाराच्या पुढे गेले आहे.
सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारामधून ४१९३ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ३ ते २० सप्टेंबर या कालावधीमध्ये या संस्थांनी ५५७७.९९ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. त्याचवेळी या संस्थांनी १३८४.८१ कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची खरेदी केली आहे. याचाच अर्थ या संस्थांनी एकूण ४१९३.१८ कोटी रुपये भारतामधून काढून घेतले आहेत.
याआधी आॅगस्ट महिन्यामध्ये या संस्थांनी ५९२०.०२ कोटी रुपये तर जुलै महिन्यामध्ये २९८५.८८ कोटी रुपये भारतीय भांडवल बाजारामधून काढून घेतले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भांडवल वृद्धीवर वाढीव दराने अधिभार आकारणी करण्याचा प्रस्ताव आल्यापासून परकीय वित्तसंस्था या सातत्याने विक्री करीत होत्या. गतसप्ताहामध्ये अर्थमंत्र्यांनी या तरतुदी भांडवली नफ्याला लागू नसल्याचे जाहीर केल्याने या संस्था खरेदीस उतरू शकतात.