शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्समध्ये ७७२ अंकांनी वाढ !

0

मुंबई : मंदीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा परिणाम बाजारात जाणवायला लागला आहे. दरम्यान आर्थिक मंदी दूर करून अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. याचाच परिणाम म्हणून आज शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात तेजीने झाली. शेअर बाजाराचे व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 772 अंकांनी उसळून 37,422.16 अंकांवर तर निफ्टी 170.95 ने वाढून 11, 000.30 अंकांवर पोहोचले आहे.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी पत्रकार परिषदेत अनेक सवलतींची घोषणा केली होती. त्यानुसार, विदेशी गुंतवणूकदार संस्था (एफपीआय) व देशांतर्गत समभाग गुंतवणूकदारांवर 2019-20च्या अर्थसंकल्पात लावलेला कराचा वाढीव अधिभार (सरचार्ज) रद्द करण्यात आला आहे. सुपर-रिच टॅक्स (अतिश्रीमंत कर) नावाने हा कर ओळखला जात होता.

वाढीव अधिभारामुळे ‘एफपीआय’नी शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने बाजार घसरणीला लागला होता. या घसरगुंडीला आता ब्रेक लागेल. हा कर रद्द केल्यामुळे सरकारच्या तिजोरीला 1400 कोटी रुपयांचा फटका बसेल. स्टार्टअप कंपन्यांचा एंजल टॅक्सही रद्द करण्याचा निर्णय निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला आहे.