न्युयोर्क- लैंगिक गैरवर्तवणुकीची गंभीर दखल घेतल गुगलने दोन वर्षात एकूण 48 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले असल्याची माहिती गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी दिली आहे. सुंदर पिचाई यांनी गुगलच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला आहे.
गुगलने लैंगिक गैतवर्तवणुकीचा आरोप असलेल्या आपल्या तीन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम देत वाचवले असल्याचा दावा करण्याता आला होता. सुंदर पिचाई यांनी आपल्या मेलमध्ये ज्या 48 कर्मचाऱ्यांवर लैंगिक गैरवर्तवणूक प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे त्यामधील 13 सीनिअर मॅनेजर किंवा सीनिअर पोस्टवरील कर्मचारी होते.
यापैकी कोणत्याही कर्मचाऱ्याला एक्झिट पॅकेज देण्यात आले नसल्याचेही सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे. या मेलमध्ये गुगलचे पिपल्स ऑपरेशन उपाध्यक्ष एलीन नॉटन यांचीदेखील स्वाक्षरी आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना गैरवर्तवणुकीची तक्रार करायची असल्यास इंटरनल टूल वापरण्याचे आवाहन केले आहे.
गुगलने आपले धोरण जाहीर केले असून सर्व उपाध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षकांना एखाद्या सह-कर्मचाऱ्यासोबत संबंध असल्यास तसे जाहीर करण्यास सांगितले आहे. ‘गुगल कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देण्यास बांधील आहे जेणेकरुन तुम्हाला कोणतीही भीती वाटता कामा नये. जर कोणी गैरवर्तवणूक केली तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे मेलमध्ये सांगण्यात आले आहे.