शहाद्यातील डॉक्टरांचे अपहरणप्रकरणी दोघांना अटक

0

अमळनेर येथे ठेवले होते डांबून : मुख्य दोघे आरोपी फरार

अमळनेर प्रतिनिधी-: सहा लाख रुपये खंडणीसाठी शहाद्याच्या दातांच्या डॉक्टरचे अपहरण करून डांबून ठेवून पिस्तूल लावून चौघांनी धमकावल्याची घटना शनिवारी घडली. अमळनेरच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील २ आरोपी फरार झाले आहेत.
शहादा येथील विजय नगरचे रहिवासी दंतवैद्यक विजय रघुवीर गोसावी गावोगावी फिरून आयुर्वेदीक दंतमंजन विक्री, दात सफाई, कवळी बसविण्याचे काम करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरविंद रवींद्र बिर्‍हाडे (वय २०) आणि महेंद्र सीताराम मोरे (४०) यांना विद्याविहार कॉलनीतून १७ रोजी रात्री १० वाजता ताब्यात घेतले. पिस्तूल लावणारे दोन मुख्य आरोपी फरार झाले आहेत. चारही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा येथील दंतजवैद्यक विजय गोसावी गावोगावी फिरून व्यवसाय करून उदरनिर्वाह भागवितात. गेल्या आठ दिवसांपासून अंजली पटेल नावाची महिला मोबाईलवरून त्यांना फोन करून तिच्या वडिलांचे दात बसविण्यासाठी येथील प्रताप कॉलनीमधील तिच्या घरी बोलवत होती. १७ रोजी गोसावी हे त्यांच्या कार (क्रमांक एम.एच.१९-सीयू-७१५५)ने त्यांच्या मावशीचा मुलगा तुषार गीर गोसावी याच्यासह अमळनेर शहरातील अ‍ॅक्सिस बँकेजवळ सकाळी १० वाजता पोहचले. त्या महिलेने तिचा भाऊ विनोद यास घेण्याकरीता पाठवित असल्याचे फोनवर सांगितले. गोसावी त्यांच्या भावासह अ‍ॅक्सीस बँकेजवळ थांबले. त्यावेळी त्यांच्या जवळ दोन जण आले व त्यांनी अंजली हिने पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर गोसावी यांनी त्या दोघांना कारमध्ये बसविले. दोघांनी गोसावी यांना शहरातील विध्या विहार कॉलनी मधील एका घरी नेले. त्यानंतर अचानक घराचा दरवाजा बंद केला. तिथे आणखी दोनजण आले.


पोलीस असल्याचे सांगून खंडणीची मागणी
चौघांनी पोलीस असल्याचे सांगून गोसावी व त्यांचा भाऊ तुषार यास मारहाण केली. मारहाणीचे कारण विचारले असता, तू एका व्यक्तीचे दात बसविल्यामुळे तो इसम दगावला आहे. त्यामुळे तुला मारहाण करण्यास आमच्या साहेबांनी सांगीतले आहे, असे चौघांनी सांगितले. येथून सुटका करायची असेल तर साहेबांना सहा लाख रुपये दे आणि आम्हा चार जणांना वेगळे पैसे दे नाहीतर तुला व तुझ्या भावाला मारुन टाकू, अशी धमकी कपाळावर पिस्तूल ठेवत त्यांनी दिली. तेव्हा घाबरून गोसावी यांनी येथील बहिणीकडून पैसे घेऊन देण्याचेच कबूलही केले. दोघांचे मोबाईल, दोन एटीएम कार्ड व गोसावी यांच्याकडील ३ हजार तर तुषार यांच्याकडील ५ हजार जबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर एकाने तुषार यांना एका स्कुटीवर बसवून नेले. त्या नंतर गोसावी हे कसेबसे इतरांच्या तावडीतून सुटून पळून गेले. शहरात लपून त्यांनी मेहुणे कोठारी यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. शनिवारी दुपारी एक वाजता गोसावी यांनी मेहुणे व नातेवाइकांसह येथील पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तेव्हा गोसावी यांचा मावस भाऊ तुषार हा देखील पोलीस स्टेशनला येऊन पोहचला.