अखेरची घटका मोजणाऱ्या शहादा सारंगखेडा रस्त्याने अखेर एक बळी घेतला.

शहादा, ता. 30: अखेरची घटका मोजणाऱ्या शहादा सारंगखेडा रस्त्याने अखेर एक बळी घेतला. शहाद्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या स्कूटीवरील 19 वर्षीय तरुणीचा रस्त्यावरील खड्यांमुळे तोल जाऊन ट्रकच्या चाकाखाली येत जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झालेत. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाचे अधिकारी या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी आणखी किती जणांच्या बळींची प्रतीक्षा करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अपघाताची नोंद करताना ट्रॅक ड्रायव्हरसह ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली त्या संबंधितांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी चर्चा परिसरात होत आहे.

वावडे, ता. अमळनेर जि. जळगाव येथील हर्षदा रवींद्र ठाकरे (वय १९) ही तरुणी आपला मावसभाऊ व मावसबहिणीला सोबत घेऊन दुचाकीने (एमएच १८ बीडब्ल्यू ०२७४) तोरणमाळवरून परत येत होती. अनरदबारीजवळील हॉटेल ओमियासमोर रस्त्यावरील खड्डे व खराब रस्त्यामुळे गाडी चालवीत असताना तिचा तोल गेला. त्यावेळी त्यांच्या मागून येणाऱ्या ट्रकच्या (क्र. एमएच ३४ बीजी ५८८५) चाकाखाली ती आली. डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा सोबत असलेला तिचा मावसभाऊ रोहित धनराज पाटील ( वय २१) व मावसबहीण गायत्री धनराज पाटील (२०) हे जखमी झालेत. ट्रकचालक गाडी जागेवर सोडून फरार झाला. सदरचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक किरण बान्हे हे पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारार्थ शहादा येथे हलविण्यात आले. शहादा येथील शासकीय रुग्णालयात हर्षदा ठाकरे हिचे शवविच्छेदन करण्यात आले. मुलीचा मृतदेह पाहून नातेवाईक सुन्न झाले.

*रस्त्याची चाळण तर दुरुस्तीकडे दुर्लक्ष…

गत तीन वर्षांपासून सारंगखेडा ते शहादा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्यासह पूर्णतः नूतनीकरण करणे अपेक्षित असताना दरवेळी थातूरमातूर दुरुस्ती पलीकडे कोणतेही काम झालेले नाही. या तीन वर्षात झालेला खर्च व मंजूर निधीची जर पडताळणी केली तर अनेक अधिकारी व ठेकेदार वादाच्या भोवऱ्यात सापडतील हे उघड सत्य लोकप्रतिनिधी यांना सुद्धा नाकारता येणार नाही. या रस्त्यावरील जागोजागी असलेले खड्डे चुकविताना असे अनेक लहान मोठे अपघात होणे ही नित्याचीच बाब असल्याने परिसरातील नागरिकांनी संबंधित महामार्ग विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत असतात. विभाग अजून किती जणांचा बळी घेण्याची वाट पाहत आहेत, अश्या भावना लोकांमधून उमटत आहेत.

*वर्क ऑर्डरला विलंब का याची माहिती जनतेला हवी…

शहादा ते सारंगखेडा हा 14 किलोमिटरचा रस्ता आहे. शहादा बसस्थानक ते वन विभागापर्यंतचा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र त्यानंतरच्या अवघ्या 12 किलोमिटरचा रस्त्याची चाळण झाली असल्याने रस्ता पूर्णतः उखडलेला आहे. तसेच याच रस्त्याला अनरद बारी येथे अंकलेश्र्वर बऱ्हाणपूर रस्ता जोडला गेलेला आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावर जागोजागी मोठमोठाले खड्डे असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने चालविणे खूपच अवघड असते. त्यामुळे कोणतेही वाहन सरळ चालताना दिसत नाही. मात्र, दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने नागरिक नाईलाजाने या रस्त्याचा वापर करताना दिसतात. वेळोवेळी झालेले आंदोलने व महामार्ग विभागाने दिलेली लेखी आश्वासने यामुळे तीन वर्षानंतर का होईना या रस्त्याच्या कामाची निविदा निघाली. यात एका प्रतिष्ठित ठेकेदाराने कमी रकमेची (बिलो टेंडर) निविदा भरल्याने या रस्त्याच्या कामासाठी जास्त रकमेची निविदा भरून स्वतःसह अधिकाऱ्यांना गब्बर करणाऱ्या ठेकेदारांचा भ्रमनिरास झाला. निविदा मंजूर झाल्याने आतातरी कामाला विनाविलंब सुरुवात होईल अशी भ्रामक कल्पना मनात घेवून नागरिक चर्चा करू लागलेत. मात्र, संबंधित ठेकेदाराची निविदा मंजूर झाली असली तरी महामार्ग विभागाकडून त्याला वर्क ऑर्डर दिली गेली नाही. या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर एका लोकप्रतिनिधीने अडवून ठेवल्याची अफवा परिसरात अद्यापही होत आहे. जोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत ती वर्क ऑर्डर दिली जाणार नाही आणि कामाला सुरुवात होणार नाही अशी परिस्थिती असल्याची चर्चा होती. शेवटी मंत्रालयातून सूत्रे हलली व आताच मागील आठवड्यात वर्क ऑर्डर देण्याची तत्परता महामार्ग विभागाने दाखवली. या अफवा आणि चर्चांबाबतची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनी जनतेसमोर मांडायला हवी. जर वर्क ऑर्डर वेळेवर दिली गेली असती तर कामाने गती घेतलेली दिसली असती. आणि या तरुणीचे अपघाती निधन झाले नसते.

*दोषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत…..

वरील सर्व घटांनाचा मागोवा घेतला असता या अपघाताला फक्त अन् फक्त महामार्गाचे संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत. त्यामुळे ट्रॅक चालकासोबत अधिकाऱ्यांच्या विरोधातही तेवढ्याच कलमांचा गुन्हा दाखल करायला हवा. पोलिस प्रशासनाने या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन घेणे अपेक्षित असल्याची दबक्या आवाजात मागणी आहे.