शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी प्रा. मकरंद पाटील तर व्हाईस चेअरमन पदी अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड.

शहादा l येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी प्रा. मकरंद पाटील पाटील व व्हाईस चेअरमनपदी अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणूकीपूर्वी सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा लोकशाही आघाडीचे नेते बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत निवडीचे सर्वाधिकार श्री. पाटील यांना देण्यात आले. सर्व संचालकांची मते जाणून घेत बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी चेअरमनपदासाठी प्रा. मकरंद नगिन पाटील यांची तर व्हाइस चेअरमनपदासाठी अरविंद सुदाम पाटील यांची नावे जाहीर केली. त्यानुसार सकाळी अकरा वाजता चेअरमनपदासाठी प्रा.मकरंद पाटील व व्हाइस चेअरमनपदासाठी अरविंद पाटील यांनी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्याने नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. खरेदी विक्री संघाचे मॅनेजर अनिल पाटील यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.

प्रा.मकरंद पाटील यांची चेअरमन आणि अरविंद पाटील यांची व्हाइस चेअरमपदी निवड झाल्याबरोबर लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खरेदी विक्री संघाच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यावेळी माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील व राजाराम पाटील, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, माजी नगरसेवक के.डी.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, विद्यमान संचालक मयूर दीपक पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे स्थापनेपासून आतापर्यंतचे चेअरमन व व्हाईस चेअरमन…..

खरेदी विक्री संघाचे संस्थापक चेअरमन डॉ. विश्राम काका पाटील यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकाराची संकल्पना घेऊन सन 1941ला शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली होती. 1941 ते 1969 या कालावधीत फक्त चेअरमन हेच पद होते. मात्र 1969 पासून व्हाइस चेअरमन हे पद निर्माण करण्यात आले. तद्नंतर परिसराचे भाग्यविधाते अण्णासाहेब पी.के. पाटील व सध्या बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून यशस्वी वाटचाल सुरू आहे. प्रा.मकरंद पाटील हे संघाचे 11वे चेअरमन तर अरविंद पाटील हे 16वे व्हाईस चेअरमन ठरले.

आतापर्यंतचे चेअरमन असे-

डॉ. विश्राम हरी पाटील, गोविंद गुलाल पाटील, बुला शिवदास पाटील, गिरधर संभू पाटील, रामदास नाना पाटील, शंकर झिपरू पाटील, नरोत्तम सजन पाटील, रोहिदास मदन पाटील, विजय विठ्ठल पाटील, राजाराम तुकाराम पाटील व मकरंद नगीन पाटील

आतापर्यंतचे व्हाईस चेअरमन असे-

दत्तू इंदास पाटील, सखाराम फकीरा पाटील, सखाराम उखा पाटील, रोहिदास मदन पाटील, दशरथ रघुनाथ पाटील, उद्धव लक्ष्मण चौधरी, रतिलाल सोमजी पाटील, रतिलाल दत्तू पाटील, शंकर झिपारू पाटील, मगन गणेश पाटील, ब्रिजलाल पुना पाटील, विजय नरोत्तम पाटील, सखाराम पुना पाटील, राजाराम तुकाराम पाटील, जगदीश मोहन पाटील व अरविंद सुदाम पाटील