नवी दिल्ली- अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जनरेटरचे काम पाहणाऱ्या ३५ वर्षीय राम कुमार यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तराखंडमधील मसुरी येथे या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. ‘कबीर सिंग’ या चित्रपटात शाहिद आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दुर्घटनेवेळी शाहिद आणि कियारा घटनास्थळी उपस्थित नव्हते.
शूटिंगदरम्यान सेटवर जनरेटर मागवण्यात आला होता. त्या जनरेटरमधील पाण्याची पातळी तपासण्यास गेला असता राम कुमारचा मफलर जनरेटरच्या पंख्यात अडकला. मफलरमुळे तोसुद्धा पंख्यात ओढला गेला. या अपघातात राम कुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
३५ वर्षीय राम कुमार मुजफ्फरनगरच्या किनोनी गावाचा रहिवासी होता. या अपघाताची कल्पना त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. या दुर्घटनेनंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.