मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्षातील नेत्यांनी संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, साधी गोष्ट आहे की, मी अनेक वर्षापासून राज्यसभेचा सदस्य आहे, आम्ही ज्या संसद भवनात बसतो तिथे नवी वास्तू बांधायची हे वृत्तपत्रात वाचलं. असा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर संसदेतील सदस्यांशी चर्चा करायची आणि त्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती.
भूमिपूजन केलं, त्यासाठी विश्वासात घेतलं नाही. आता तयार झाली तर उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होत असते, ही पद्धत आहे. पण त्यांनी तेही केलं नाही. ज्या प्रकारे कार्यक्रम चालला आहे, त्याची चर्चाही कधीच केली नाही. त्यामुळे कुणाला विश्वासात न घेता निर्णय घेतला आहे. आता विरोधी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका घेतली आहे, त्याला माझा पाठिंबा आहे, असं शरद पवार म्हणाले.