ईडीचे अधिकारी शरद पवारांना भेटणार नाहीत; घराबाहेर न निघण्याची विनंती

0

मुंबई: राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून नाव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:हून ईडी कार्यालयात हजर राहून आपल्यावरील आरोपाचा खुलासा करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र शरद पवारांना ईडीचे तपास अधिकारी भेटणार नाहीत. त्यांना काही निवेदन द्यायचे असेल तर इतर अधिकारी भेटतील. आम्ही चौकशी सुरु केली नाही ज्यावेळेला गरज भासेल तेव्हा शरद पवारांना चौकशीसाठी बोलविले जाईल असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे.

सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनी घेतली शरद पवारांची भेट आहे. शरद पवारांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती पोलिसांनी केली आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेतेदेखील शरद पवारांच्या बंगल्यावर जमा झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी १४४ कलमान्वये जमावबंदी लागू केली आहे.

दरम्यान पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली आहे.