दुधाच्या प्रश्नासाठी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
दूध दर, दुधाच्या भुकटीचे दर तसेच दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटीवर चर्चा 
मुंबई – राज्यात सध्या गाजत असलेल्या दूध प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी दूध दर, दुधाच्या भुकटीचे दर तसेच दुग्धजन्य पदार्थावरील लावण्यात आलेला जीएसटी याबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.
राज्यात दूध दराचा प्रश्न गंभीर झालेला आहे. दूध दराच्या संदर्भात कोणताच ठोस निर्णय राज्य सरकारला आतापर्यंत घेता आलेला नाही. शासनाने आतापर्यंत तीन जीआर काढले, मात्र त्याचा कोणताही परिणाम दूध दर वाढण्यात झालेला नाही. या दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
यामध्ये दूध उत्पादकांना मदत, दूध भुकटीला निर्यातीसाठी प्रोत्साहन आणि दुग्धजन्य पदार्थांवर लावण्यात आलेली जीएसटी कमी करावी, अशा सूचना शरद पवारांनी केल्या आहेत. दूध प्रश्नाबरोबरच फळबाग योजना ही रोजगार हमी योजनेसोबत जोडून घ्यावी, अशी मागणीही शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी  आश्रमशाळांच्या समस्या, प्लॅस्टिक वापरावरील बंदी, याही प्रश्नांवर  चर्चा केली. या सगळ्या मुद्यांवर  सरकार लक्ष देईल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.