काँग्रेस आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूका लढणार

0

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माहिती

मुंबई :- काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून महाराष्ट्रात एकत्र निवडणूका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की, आज वेगळया कामासाठी एकत्र येण्याचे ठरवले होते. परंतु मुंबई अध्यक्ष निवड करताना जिल्हया-जिल्हयाचे मत ऐकून घ्यावे असे मत समोर आले. त्यामुळे त्या निर्णयानुसार निवड होणार आहे.

आज छगन भुजबळ असते तर मला आनंद झाला असता. मात्र ते बाहेर आले त्याचं समाधान नक्कीच आहे. ते बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याबाबतीत अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल. पहिल्या टप्प्यात यश आले आहे. दुसऱ्या टप्प्यातही यश मिळेल अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली. मुंबईमध्ये निवडणूका जवळ आल्याने संघटनेला व्यवस्थित चेहरा दयायचा आहे. यश-अपयश येतच असतं. परंतु विचार आणि बांधिलकी कायम ठेवायची असते ती बांधिलकी तुम्ही ठेवली आहे असेही शरद पवार म्हणाले.

जुन्या लोकांना बरोबर घेवून नवीन चेहऱ्यांना संधी दयायला हवी. अधिक उत्साहाने काम करणारे व लोकांनी पसंद केलेले सर्व घटकातील लोक पुढे आणण्याची गरज असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. मुंबई ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जायची. एक कामगारांची सामुहिक शक्ती पाहायला मिळत होती. गिरणगाव हे गिरणगाव आज राहिलेले नाही. वेगळया विचारांचा कामगार आज आला आहे. त्यामध्ये व्हाईट कॉलर कामगारांचा समावेश आहे. विशेष करुन त्यामध्ये शासकीय कामगार, अनेक संस्थामध्ये काम करणारा कामगार आहे. यांची संख्या व शक्ती वाढलीय त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचे आवाहन करतानाच सामुहिक संघटन उभं करण्याची गरज आहे. मध्यमवर्ग हा मतं तयार करतो. त्यांच्याशी संपर्क कसा वाढेल याची काळजी घ्यायला हवी असे मार्गदर्शनही शरद पवार यांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी या मुंबई नगरीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत असे स्पष्ट केले. शरद पवारसाहेबांचे विचार या शहरात रुजवण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत. राज्यात आपण बुथ लेवलचा कार्यक्रम राबवणार आहोत तोच कार्यक्रम मुंबईतही राबवला जाईल. वॉर्ड अध्यक्षांनी रोज एक चक्कर वॉर्डात मारावी ज्याच्यामुळे सामान्य माणसाच्या समस्या, त्यांचे प्रश्न कळतील. जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून एकदा तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घ्यावी असेही जयंत पाटील यांनी सांगितले.