शरद पवार यांची मोठी घोषणा! पक्षाचे अध्यक्षपद सोडणार? राजीनामा मागे घेण्यासाठी घोषणाबाजी!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. शरद पवारांनी त्यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना ही घोषणा केली आहे. कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही असं सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शरद पवारांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?

“महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने 56 वर्षं मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं. अजूनही माझी राज्यसभेची तीन वर्षं बाकी आहेत. इतकी संधी आजपर्यंत कोणालाही मिळालेली नाही. इतकी वर्षं सतत लोकसभा, राज्यसभेत असणारी व्यक्ती मला पाहायला मिळालेली नाही. करुणानिधी हे एकमेव आहेत, ज्यांचा इतका मोठा कालखंड होता. अडवाणी, वाजपेयी यांना पराभव पाहावा लागला होता. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी पराभल दाखवला नाही. 63 वर्षांपासून माझा प्रवास सुरु असून यातील 56 वर्ष सत्तेत आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

“मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. यापुढे देशाच्या, राज्याच्या प्रश्नात लक्ष घालणार. याशिवाय इतर कोणतीही जबाबदारी घेणार नाही. इतकी वर्षं संधी झाल्यानंतर कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे,” अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केली.