मुंबई: चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढीच्या दरात घट झालेली असताना, बेरोजगारीचा दर ४५ वर्षातील सर्वोच्च स्थानी असताना तसेच वाहनांच्या विक्रीत घट झालेली असतानाही शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा ऐतिहासिक उसळी घेतली. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स ५५३ पॉईंटवरुन उसळी घेत ४०,२६८ वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने १६६ पॉईंटने उसळी घेत बाजार १२,०८९ उच्चांकावर बंद झाला.
दरम्यान, अनेक नकारात्मक आकडे समोर असतानाही गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर विश्वास का दाखवला, याबाबत तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरु असून यामध्ये प्रामुख्याने चार प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
जीडीपी खालावलेला असताना तसेच वाहनांच्या वक्रीतही घट झालेली असताना आता रिझर्व्ह बँक आपल्या आगामी बैठकीत वैयक्तीक व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय घेणार आहे. या बैठकीत ०.२५ टक्क्यांनी दरात कपात होईल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. ६ जून रोजी ही एमपीसीची बैठक होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते.
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत अणू कार्यक्रमांतर्गत विनाशर्त चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सोमवारी कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी घट झाल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया ४० पैशांनी मजबूत होत ६९.२९ डॉलर इतका झाला. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीत तेजी आली होती. नव्या सरकारने आपल्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत शेतकरी योजनेचा परीघ वाढवून यामध्ये सर्व शेतकऱ्यांना समाविष्ट करुन घेतले. त्याचबरोबर ६० वर्षांपुढील छोट्या शेतकऱ्यांना प्रतिमहिना ३००० रुपये पेन्शनच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर इतक्याच रकमेची पेन्शन योजना छोट्या दुकानदारांना, किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांनाही लागू करण्यात आली आहे. याचाही परिणाम शेअर बाजारावर पहायला मिळाला, असे अर्थतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.