मुंबई :- कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने आघाडी घेतल्याचे स्पष्ट होताच शेअर बाजारात मोठी उसळी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी ७२ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी आठ वाजज्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीचा काही काळ काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर भाजपाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या दोन्ही पक्षांना बरेच पाठी टाकले. भाजपाने कर्नाटकात आघाडी घेतल्याचं स्पष्ट होताच सेन्सेक्स २५६ अंकाच्या वाढीसह ३५,८१२ वर पोहोचला आहे, तर निफ्टी ५८ अंकांच्या वाढीसह १०,८६५ वर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं चित्र आहे.
भाजपाने कर्नाटकात आघाडी घेतल्याचे चित्र समोर येताच शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. आज बाजार उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिर होता. यापूर्वी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी शेअर बाजार स्थिर राहिला. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये २० अंशांची वाढ होऊन तो ३५ हजार ५५६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ८०६ अंशांवर स्थिर राहिला होता.