शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमारांना दिला काम करण्याचा सल्ला

0

पाटना-भाजपात असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आता रालोआचा सहकारी पक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रिय मित्र, आता काम सुरू करा.. नाहीतर अर्जुन सत्ता मिळवण्यासाठी तयार आहेच. तेजस्वी यादव यांचे आव्हान आता तुमच्या दारी येत आहे, असे ट्विट करत त्यांनी नितीश कुमार यांना इशाराच दिला आहे. रालोआमध्ये सहभागी असलेले माझे प्रिय मित्र, बिहारसाठी काही तरी काम करण्यास सुरूवात करा.. नाहीतर अर्जुन म्हणजेच तेजस्वी यादव तुमची जागा घेण्यासाठी तयार आहे. तेजस्वी यांचे आव्हान आता बिहारच्या प्रत्येक भागात घुमत आहे, असे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले.

विशेष राज्याचा दर्जा हे मगरीचे अश्रू

यापूर्वी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी अर्थहीन आणि निवडणुकीपूर्वीचे हे मगरीचे अश्रू असल्याची टीका केली होती. बिहारमध्ये कामगिरीऐवजी प्रचारावर जास्त जोर आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. सिन्हा हे पाटणासाहिब मतदारसंघातून लोकसभेवर गेले आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेतृत्वावर टीका करताना दिसत आहेत. नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. तसेच ही मागणी १५ व्या वित्त आयोगासमोर ठेवण्याचेही संकेत दिले होते. त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील मोदी आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही पाठिंबा दिला आहे. नितीश कुमार यांच्या या वक्तव्याचा समाचार शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतला आहे.