नवी दिल्लीः लोककथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्याने भारतीय लष्कराचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच ती पावले येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्याने केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.
भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहण पथकाला 9 एप्रिल 2019 रोजी मकालु बेसकॅम्पच्या परिसरात ‘येती’ या पौराणिक प्राण्याच्या पावलांचे 32 इंच लांब आणि 15 इंच रुंद अशा आकाराचे रहस्यमय ठसे आढळले. परंतु भारतीय लष्कराचा हा दावा नेपाळच्या सैन्याच्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावला आहे. भारतीय लष्कराला येतीच्या पाऊलखुणा दिसल्यापासून आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. स्थानिक आणि आमच्या तज्ज्ञांच्या मते ती पावले जंगली अस्वलाची आहेत, असे नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल बिग्यान देव पांडे यांनी सांगितले आहे.