शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

0

नवी दिल्ली: मोदी सरकार 2च्या दुसऱ्या पार्वतील पहिले अर्थसंकल्प तीन दिवसांपूर्वी सादर झाले. केंद्र सरकारने अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरणीला सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन दिवसात गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडालेले असताना आज पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना जोरदार दणका बसला आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये २१६ अंकाची घसरण पाहायला मिळाली.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. आज मंगळवारी ही घसरण सुरूच राहिल्याचे दिसले. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये २१६ अंकाची घसरण झाली. त्यानंतर सेन्सेक्स ३८ हजार ५०४ अंकावर होता. तर ६६ अंकाच्या घसरणीसह निफ्टी ११ हजार ४९१ अंकावर होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) च्या प्रमुख इंडेक्स सेन्सेक्समध्ये ६९ अंकाच्या घसरणीसह ३८ हजार ६५१ अंकावर बाजार उघडला. आजच्या घसरणीमुळे टायटन कंपनीला मोठे नुकसान झाले. या कंपनीच्या शेअरमध्ये ९ टक्के घसरण झाली. यूपीएल, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि बजाज फिसर्वच्या शेअरमध्ये १.५ ते २.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. एकीकडे काही कंपन्यांची घसरण होत असताना आयओसीच्या शेअरमध्ये ३.७ टक्के वाढ झाली. बीपीसीएल, कोल इंडिया, येस बँक आणि ओएनजीसीच्या शेअरमध्येही वाढ झाली. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य ६८.६५ रुपये इतके रहिले. सोमवारीही रुपयाचे मूल्य ६८.६५ रुपये इतकेच होते.