नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. सलामीचा फलंदाज शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे वर्ल्डकप २०१९ ला मुकला आहे. विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांपर्यंतदेखील तो दुखापतीतून बाहेर येणार नसल्याने त्याला स्पर्धेबाहेर जावे लागणार आहे. बीसीसीआयने हे अधिकृत ट्विटर हँडलवर जाहीर केले आहे. धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावेळी मँचेस्टर येथे पोहोचला.
‘शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला बॉल लागल्यामुळे फ्रॅक्चर झाले आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची मते जाणून घेतल्यानंतर असे स्पष्ट झाले आहे की धवनला दुखापतीतून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी जुलैच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. परिणामी तो वर्ल्डकपच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.’ असे ट्वीट बीसीसीआयने केले आहे.
धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पॅट कमिन्सचा बॉल लागून अंगठ्याला दुखापत झाली होती. धवनच्या जागी सध्या संघात ऋषभ पंत इंग्लंडला पोहोचला आहे. त्याच्या संघप्रवेशाबद्दल अद्याप बीसीसीआयने निवेदन दिलेले नाही.