‘शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’; शरद पवार

पुणे : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

शरद पवार म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातही गारपिटीने, पावसाने टोमॅटो, द्राक्ष, कांद्यासारखी अनेक पीकं शेतकऱ्यांच्या हातून गेली. विदर्भात सोयाबीन आणि कापसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याचे पंचनामे झाल्याचे सरकारने सांगितले, तरीही तिथे अजूनही मदतीचा पत्ता नाही. अशा संकटग्रस्तांना मदत नाही.

जे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही आणि दुःखात सहभागी होत नाहीत. त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आज अनेक वर्ग अस्वस्थ आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. शेती मालाचे अर्थशास्त्र भाजपने बिघवडले, असं शरद पवार म्हणाले. सत्ता हातात नसली, सरकार नसले, तरी तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढू अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.

देशाच्या जवानांचे रक्षण करण्याची जबाबदारी देशाच्या सरकारवर आहे. ती सुद्धा पार पाडायची नाही अशी भूमिका जे सरकार घेते त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्यासाठी पुढील निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे, असंही शरद पवार म्हणाले.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राष्ट्रवादीच्या वतीने युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबंधित करताना शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, युवक प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. दरम्यान या मेळाव्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. मात्र अजित पवारांची अनुपस्थिती या मेळाव्यात लक्षणीय ठरली.