शिवसेनेचे उमेदवार भाजपामुळे निवडून आले : चंद्रकांत पाटील

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत आहे. आपल्या जनआशीर्वाद दौऱ्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय जनतेने घ्यायचा असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना युतीबाबत मोठे वक्तव्य केले असून, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार भाजपामुळे निवडून आले आहेत असे म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसात भाजपाची ताकत वाढली आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती टिकून राहणे महत्वाचे आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढले असते तर युतीला इतक्या जागा मिळणे अवघड झाले असते असे सूचक विधान त्यांनी केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला मतदान कमी झाले नसल्याच्या दावा त्यांनी केला आहे.

भाजपा आणि शिवसेना हे एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. दोघेही एकाच घरातील भावंडे आहे. काही मतभेद असले तरी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र कार्यकर्त्यांनी सर्व २८८ जागांची तयारी करावी. कारण आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकल्या तरी आपल्याला मित्रपक्षांची गरज पडेल. त्यामुळे मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणावे लागतील. त्यासाठी सर्व जागांवर चोख तयारी असणे आवश्यक असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.