मुंबईः आज मुंबई येथील मातोश्री वर शिवसेना नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना आमदारांनी आक्रमक भूमिका घेत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. यामुळे ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून लेखी पत्र घेतल्याशिवाय पुढचा निर्णय घेऊ नये, अशीही मागणीही शिवसेनेतून करण्यात आली आहे.
भाजप ठरल्याप्रमाणे वागली नाही तर इतर पर्याय खुले असल्याचे उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले. तर दिवाळीनंतर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होईल. यात फॉर्म्युला निश्चित केला जाईल, असे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दाने यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी महाराष्ट्रात सत्तेत समान वाटा दिला जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिलं होतं. यामुळे मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष असावं अशी मागणी शिवसेनेने केली. सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर दिली. जवळपास एक तास शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक चाचली. मुख्यमंत्रीपदात समान वाटा मिळेपर्यंत पुढील चर्चा नको, अशी भूमिका आता शिवसेनेनं घेतलीय.
दरम्यान, शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये दिवाळीनंतर बैठक घेतली जाईल. या बैठकीत सत्ता स्थापनेवर चर्चा होईल आणि त्यात फॉर्म्युला ठरवला जाईल. सत्तेत लहान भाऊ, मोठा भाऊ हे क्षमतेवरच ठरतं. पण चर्चा करून निर्णय घेतला जाईल. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांच्या मागण्या असतात. तशी मागणी शिवसेनेतूनही करण्यात आलीय, असं भाजपचे नेते आणि खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.