शिवसेना शिंदे गट-भाजपा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? राहुल शेवाळेंची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बेठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १३ खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांचा आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला आहे. शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, सर्व खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही आढावा बैठक होती. शिवसेनेच्या १३ खासदारांच्या लोकसभा कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काय करायचं याबाबत चर्चा झाली.

शिवसेनेने ज्या २२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली, त्या २२ जागांबाबत तयारी करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे १३ विद्यमान खासदार आणि इतर जागांचा आढावा घेतला जाईल आणि त्या दृष्टीकोनातून लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाईल, असं राहुल शेवाळे म्हणाले.