मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट तयार झाले आहेत. निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना दिले आहे. यावरून दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेना फुटीनंतर आता मुंबईत यंदा दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचा येत्या १९ जूनला वर्धापन दिन आहे. यासाठी शिवसेनेचे आमदार आणि नेते कामाला लागले आहेत. या सोहळ्यासाठी मुंबईत दोन्ही गटाच्या स्वतंत्र्य बैठकी झाल्या आहेत. ठाकरेंनी यंदाचा वर्धापन दिन हा आनंदोत्सव साजरा करायचा आदेश जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार देखील या वर्धापन दिनाच्या तयारीला लागले आहेत. १८ जूनला मुंबईत राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी झालेला दसरा मेळावा देखील दोन ठिकाणी झाला होता. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला होता. त्याचप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन देखील दोन ठिकाणी पार पडणार आहे. मात्र त्यासाठीचे ठिकाणे अद्याप ठरलेली नाहीत.