मुंबई: नरेंद्र मोदी यांच्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळात शिवसेनेचे अरविंद सावंत यांचे स्थान पक्के झाले आहे. आज अरविंद सावंत मंत्रीपदाची शपथ घेणार आहे असे सेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत.
गेल्या दोन दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात कुणाला मंत्रीपद द्यावे या विषयी बैठक सुरु होती पाहता पाहता शपथविधीचा दिवस उजाळून गेला तरी कुणाला मंत्रीपद दिले जाईल हे निश्चित झाले नव्हते. शेवटी आज कुणाला मंत्री पद दिले जाईल हे हळूहळू बाहेर येत आहे.
राज्यात शिवसेना, भाजप युतीला लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४१ जागा मिळाल्या असून शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहे. त्यामुळे एनडीएमधील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मागच्या वेळी शिवसेनेला केवळ एक मंत्री पद आले होते. आता शिवसेनेला एक कॅबिनेट आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीपदं अशी दोन मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे समजते. त्यापैकी एका जागेसाठी सावंत यांचे नाव निश्चित झाले आहे.