आयुक्तांना ’गाजर’ देवून शिवसेनेची गांधीगिरी

0

सात दिवसात शहरात स्वच्छता न केल्यास कचरा उचलून मनपात टाकण्याचा इशारा

जळगाव– शहर विकासाबाबत सत्ताधारी आणि अधिकार्‍यांकडून केवळ आश्वासन दिले जाते.मात्र विकास कामे केले जात नाही.तसेच सोयी सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. साफसफाईसाठी एकमुस्त ठेका देण्यात आला आहे.परंतु साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे.परिणामी जळगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे प्रशासनाने लक्ष देवून शहरात स्वच्छता करावी,केवळ आश्वासनाचे गाजर देवू नये यासाठी शिवसेनेतर्फे आयुक्तांना निवेदनाबरोबरच ’गाजर’ देवून गांधीगिरी करण्यात आली.दरम्यान,सात दिवसात शहरात स्वच्छता न केल्यास कचरा उचलून मनपात टाकणार असा इशारा देखील शिवसेनेने दिला आहे.

आयुक्तांना घेराव

साफसफाईसाठी एकमुस्त ठेका देण्यात आला आहे.मात्र शहरात कचर्‍याची समस्या बिकट झाली आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या खासगी कंपनीच्या ठेकेदाराकडून चालढकल सुरू असताना सत्ताधारी आणि मनपा प्रशासनाकडून ठेकेदाराला अभय दिला जात आहे.शहरात साफसफाई होत नसलेल्या शिवसेनेने आक्रमक होवून मनपा विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, सेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे , नगरसेवक नितिन बरडे,अमर जैन यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या दालनात जावून त्यांना घेराव घतला.दरम्यान,आयुक्तांना गाजर भेट देऊन शिवसेनेने कचर्‍याच्या समस्येकडे लक्ष वेधत प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

यावेळी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी ऐन दसरा दिवाळी हे सण अस्वच्छतेच्या विळख्यात साजरे झाले. तरी देखील प्रशासनाने घाईगर्दीत मक्तेदाराचे 1 कोटी 46 लाख रुपये बिल अदा केल्याने स्वच्छतेच्या मक्त्यावरुन सत्ताधारी व प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त केला. शहराच्या स्वच्छतेची अवस्था वाईट झाली आहे. तुम्ही एकदा शहरातच काय सतरा मजली इमारतीच्या भोवताली चक्कर मारुन परिस्थिती तुमच्या लक्षात येईल असे सुनिल महाजन यांनी आयुक्तांना सांगितले.अनेकवेळा उपायुक्तांकडे स्वच्छतेच्या तक्रारी केल्यात तरी त्याची दखल घेतली जात नाही. महासभेत मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करुन देखील प्रशासन ऐकत नाही. स्वच्छतेच्या इतक्या तक्रारी असून देखील त्याची 1 कोटी 36 लाख रुपयांची बिले अदा का करण्यात आली असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.

शिवसैनिक आक्रमक

कचर्‍याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने आयुक्तांना गाजर भेट दिले. कचर्‍याच्या ठेक्यात सत्ताधारी भाजपतील काही नगरसेवक, अधिकारी तसेच ठेकेदाराचे साटेलोटे असून सर्वांनी मिळून मलिदा लाटला आहे. या प्रकाराची सखोल चौकशीची मागणीही करण्यात आली.
शहरातील सर्व कचरा येत्या 7 दिवसात उचलावा, संबंधित ठेकेदाराला कामात सुधारणा करण्याच्या सूचना कराव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शहरातील कचरा येत्या 7 दिवसात उचलला नाही तर शिवसेना तो कचरा उचलून महापालिकेच्या आवारात आणून टाकेल, असा इशारा देखील शिवसनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिला. शिवसेना पदाधिकार्‍यांच्या संतप्त भावना ऐकून घेतल्यावर आयुक्तांनी त्यांना मक्तेदाराच्या कामात सुधारणा करण्यासाठी त्यांला तंबी देणार असल्याचे तसेच कामात केलेल्या चालढकलीबद्दल नियमानुसार दंड कपात करण्यात येईल असे आश्वासन दिले. आंदोलनात शहर संघटक दिनेश जगताप,विलास भदाणे, गणेश गायकवाड,शंतनू नारखेडे ज्योती शिवंदे यांच्यासह नरगसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.