नाशिक: विधानपरिषद निवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्याने नाराज असलेले दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवीत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानस भाऊ रमेश कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यापाठोपाठ नाशिक येथील शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजी सहाणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. शिवाय त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवाजी सहाणे यांनी मागील निवडणूक ज्यांच्याविरोधात लढली त्याच पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली आहे. शिवसेनेने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सहाणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्याचा परिणाम म्हणून सहाणे यांची सेनेतून हकालपट्टी झाली.