सचिन अहिर बांधणार शिवबंधन

0

मुंबई: मुंबई मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त येत आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यामुळे नेत्यांच्या पक्षबदलाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. सचिन अहिर यांच्या पक्ष बदली मुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.

सचिन अहिर यांनी काल संध्याकाळी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आपल्या भावी वाटचालीची कल्पना कार्यकर्त्यांना दिली. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. आतापर्यंत जशी साथ दिलीत, अशीच पुढेही द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, शिवसेना प्रवेशावेळी मोठ्या संख्येने मातोश्रीवर उपस्थित राहा, अशी विनंतीही त्यांनी केल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘शिवबंधन’ बांधणार आहेत.

सचिन अहिर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, मागील निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीकडून लढून पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळं काळाची पावलं ओळखून त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, ते करताना त्यांनी भाजपऐवजी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. शिवसेनेकडून ते भायखळा विधानसभा लढवण्याची शक्यता आहे.