भाजपासोबत युती झाली नाही तर शिवसेनेत पडणार फूट

0

नागपूर :- होऊ घातलेल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली नाही, तर शिवसेनेत मोठी उभी फूट पडेल, असा अंदाज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये वर्तवला. शिवसेनेने भाजपासोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, आमची भाजपासोबत निवडणूकपूर्व नैसर्गिक युती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत विचार करावा. जर शिवसेना दूर गेली तरी रिपाइं मात्र भाजपासोबतच राहणार , असे त्यांनी स्पष्ट केले.

आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, युतीबाबत आपण शिवसेनेचे संजय राऊत व सुभाष देसाई यांच्याशीही चर्चा केली आहे. तसेच पंतप्रधानांनी देखील या मुद्यावर शिवसेनेशी बोलावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही बाब टाकली आहे. ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वच समाजातील लोकांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न
पुणे येथे रिपाइंचे राष्ट्रीय अधिवेशन २७ मे रोजी होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील काळात दलितांसह ओबीसी, मराठा, मुस्लीम अशा सर्वच समाजातील लोकांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. या सर्वांना सोबत घेऊन गावागावात शाखा सुरू केल्या जातील. बाबासाहेबांचा रिपाइं पुढे चालवायचा असेल तर सर्वांना सोबत घेण्यावाचून पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले. दलित व आदिवासी महाामंडळांनी दिलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी पक्षाच्या अधिवेशनात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.