मुंबई – हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर स्व.बाळासाहेब ठाकरे यांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. चेतन राऊत या कलाकाराने 33 हजार रुद्राक्षांनी बाळासाहेबांची प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीने त्यांना मानवंदना अर्पण केली आहे.
बाळासाहेब ठाकरे हे नेहमी रुद्राक्ष माळ घालत होते. तब्बल ३३ हजार रुद्राक्षांचा वापर करुन ८ बाय ८ फूट या आकारातील ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. तसेच या माध्यमातून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्नही चेतन राऊतने केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील नारायण पेठेमध्येही त्यांचे ६० बाय ६० आकाराचे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. युवासेनेचे शहराध्यक्ष निरंजन दाभेकर यांच्या कल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. प्रसिद्ध कलाकार निलेश खराटे यांनी हे चित्र साकारले आहे. भारतात पहिल्यांदाच बाळासाहेबांचे इतके भव्य चित्र साकारण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादरमधील महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्मारक उभारणीसाठी मुंबई पालिकेकडून स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. त्याची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी बाळासाहेबांच्या जयंती दिनी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करतील.